धनंजय देशमुख: पंकजाताईंनी एकदाच व्हिडिओ कॉल केला, पण धनुभाऊंनी साधी विचारपूस केली नाही; संतोष देशमुखांच्या भावाची खंत
स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एकदाच व्हिडिओ कॉल केला होता. पण धनंजय मुंडे यांनी अद्याप साधी विचारपूस केली नाही, अशी खंत धनंजय देशमुख यांनी बोलून दाखवली आहे. पंढरपूर : स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एकदाच व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नीने आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, असे पंकजा मुंडे यांना सांगितले होते. किंबहून ही घटना घडल्यानंतर एकदाही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आम्हाला साधा फोनही केला नाही किंवा भेटायलाही आले नसल्याची खंत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बोलून दाखवली आहे.
सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने आज बुधवार 22 जानेवारी रोजी पंढरपूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चास देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया देत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
पालकमंत्री अजित पवारांना या सर्व प्रकारावर जाब विचारणार- धनंजय देशमुख
बीडचे पालकमंत्री अजित पवार हे एकदाच आम्हाला भेटले. मात्र आता आम्ही संपूर्ण मस्साजोगचे ग्रामस्थ एकतर त्यांना भेटायला जाणार किंवा त्यांना तरी गावात बोलावणार आणि या सर्व प्रकारावर जाब विचारणार, असे ही धनंजय देशमुख यांनी सांगितले. आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे असून यासाठी उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशा मागणीचा पुनरुच्चार ही धनंजय देशमुख यांनी यावेळी केला.
….तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार?
आमच्या वडिलांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली, तशीच शिक्षा ही हत्या करणाऱ्यांना झाली पाहिजे. माझा संपूर्ण महाराष्ट्र आमच्यामागे उभा आहे. तरीसुद्धा आम्हाला अजूनही भीती वाटते. पोलीसच गुन्हेगारांना थारा देत असतील तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल करत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने भीती व्यक्त केली आहे.
पंढरपूर येथे आज आक्रोश मोर्चाचे आयोजन
सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने आज बुधवार 22 जानेवारी रोजी पंढरपूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी दिली. या मोर्चास मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भोसले यांनी केली.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.